नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष NIA न्यायालयाने गुरुवार 31 जुलै रोजी ऐतिहासिक निकाल जाहीर करत सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी यांना “पुराव्यांअभावी” दोषमुक्त करण्यात आले.
विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी 1000 पानांचा निकाल वाचताना तपास यंत्रणेच्या अनेक त्रुटींवर बोट ठेवले, ज्यामुळे हा खटला देशातील सर्वात वादग्रस्त प्रकरणांपैकी एक ठरला. निकालानंतर समीर कुलकर्णी यांना न्यायालयातच अश्रू अनावर झाले, तर इतर आरोपींनी “17 वर्षांनी पुनर्जन्म झाल्यासारखे वाटत आहे” अशा भावना व्यक्त केल्या.
29 सप्टेंबर 2008 साली राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रात्रीच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला. त्यामुळेच जखमींची संख्या जास्त होती. घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, 30 सप्टेंबर 2008 साली, मालेगावच्या आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी या लोकांचा या घटनेच्या मागे हात होता अशी माहिती समोर आली होती.
गेल्या 17 वर्षापासून याप्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सुरुवातीला ATS कडे हा तपास होता, नंतर एनआयएकडे हा तपास वर्ग करण्यात आला. एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन देखील मंजूर केला होता. अखेर आज या खटल्याचा निकाल समोर आला असून पुराव्यांअभावी 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.