मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाइक टॅक्सीला परवानगी देण्यात आली असून राज्यात केवळ ई-बाइक टॅक्सीला परवानगी असणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. ई-बाइक टॅक्सीसाठी राज्य सरकारच्या वतीने दहा हजार रुपये अनुदान देखील देण्यात येणार आहे. तसेच कमीत कमी खर्चात प्रवाशांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. यासोबतच महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाइक टॅक्सला मंजुरी देण्यात आली असल्याचा माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमाशी बोलताना दिली. कमी खर्चामध्ये चांगला प्रवास करता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र यामध्ये पेट्रोल बाइकला परवानगी देण्यात येणार नाही. तर केवळ इलेक्ट्रिक बाइकला परवानगी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या ई-बाइक टॅक्सीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार असल्याचेही प्रताप सरनाईक माध्यमांशी बोलताना म्हणाले. इलेक्ट्रिक बाइकला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दहा हजार रुपये अनुदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या माध्यमातून दहा हजारांपेक्षा अधिक रोजगार निर्मिती मुंबईत तर वीस हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मिती ही महाराष्ट्रात होइल, असा विश्वास देखील प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.