ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : दादा करणार 288 जागांवर सर्वेक्षण !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. पक्षाच्या पहिल्या अंतर्गत सर्वेक्षणात या सर्व आमदारांचा अहवाल सकारात्मक आला असून, त्यांना पुन्हा मैदानात उतरवण्यात येणार आहे. सध्या राष्ट्रवादीत 41 आमदार असून, त्यापैकी जवळपास 25 टक्के आमदार हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत.

शरद पवार यांचे नेतृत्व झुगारून जून 2023 मध्ये ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षातील आमदारांनी अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आणि आपलाच गट हा मूळ पक्ष असल्याचा दावा केला. या दाव्याला दुजोरा देत निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. पक्षाने उतरवलेल्या चार उमेदवारांपैकी केवळ एकच खासदार निवडून आला, तर पाठिंबा दिलेल्या उमेदवारालाही पराभव पत्करावा लागला.

विधानसभा निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यातील सर्व 288 जागांवर सर्वेक्षण करणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. तसेच, पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी नवीन कंपनीची नेमणूक करण्यात आली असून, तिनेच पक्षाला गुलाबी रूप दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!