मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रातील येत्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात येईल, असे म्हटले जात आहे. आज सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबद्दलची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी चर्चा रंगली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद किती वाजता होईल याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
तर दुसरीकडे सह्याद्री अतिथीगृहावर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. ही या महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याचे बोललं जात आहे. यामुळे आज मंत्रालयाबाहेर अनेक लोकांनी गर्दी केली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामं मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात लगबग पाहायला मिळत आहे. तसेच आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांना हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या मंत्रिमंडळ बैठकीकडे लागले आहे.