मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर अनेक आमदार नाराज होतील, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आचारसंहिता लागण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असतानाही मंत्रिपदासाठी आमदार इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन अडीच महिन्यांत जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी निवडणूक तयारी सुरू केली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन काही नव्या चेहर्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र निवडणूक आचारसंहिता लागायला काही दिवस शिल्लक असताना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
या चर्चेनंतर इच्छुक आमदारांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. आमदार संजय शिरसाट म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार हा झालाच पाहिजे. अन्यथा अनेक आमदार नाराज होतील. हा विस्तार करायला काहीही हरकत नाही. मुख्यमंत्री आणि महायुतीचे प्रमुख नेते मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना शिंदे गटात अनेक आमदार मंत्रिपदासाठी दावेदार आहेत. त्यात भरत गोगावले, संजय शिरसाट यांची नावे आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे हे संभाजीनगरचे खासदार म्हणून निवडून आल्याने त्यांच्या रिक्त जागी आपली वर्णी लागेल याची खात्री शिरसाट यांना आहे. त्यामुळे दोन अडीच महिने का होईना मंत्रिपदावर राहून माजी मंत्री ही बिरुदावली लावण्यास शिरसाट आणि काही आमदार उत्सुक आहेत. त्यामुळेच शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाहीतर आमदारांमध्ये नाराजी निर्माण होण्याचे सूतोवाच केले आहे.