पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरु असतांना लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे मतदानानंतर थेट अजित पवार यांच्या काटेवाडी येथील घरी पोहोचल्या. या भेटीत आपण केवळ आपल्या काकू म्हणजे अजित पवारांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतल्याचा दावा केला. पण त्यांची ही भेट राजकीय दृष्टिकोनातून मास्टरस्ट्रोक ठरण्याची शक्यता आहे. कारण राजकीय विश्लेषकांनी या भेटीमुळे सुप्रिया सुळेंना प्रत्यक्ष मतदानात लाभ होईल असा दावा केला आहे.
सुप्रिया सुळे व त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी सकाळीच मतदान उरकले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मतदान केंद्रांवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर अचानक त्या अजित पवार यांच्या काठेवाडी येथील घरी जाऊन पोहोचल्या. तिथे त्यांनी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई यांची भेट घेतली. त्यानंतर त्या तत्काळ माघारी फिरल्या. पण तिकडे त्यांच्या या कृतीमुळे बारामतीसह अख्खा महाराष्ट्र कन्फ्युज झाला. निवडणुकीनंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का? अशी गरमागरम चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषकांनी सुप्रिया सुळे यांच्या या अनपेक्षित भेटीचा त्यांना मतदानात फायदा होणार असल्याचा दावा केला आहे. बारामतीत स्थानिक पातळीवर सध्या कटुता आली आहे. पवारांची मतपेढी विभागली गेली आहे. प्रचारात आलेली कटुता केवळ एका भेटीने दूर होणार नाही. पण सुप्रिया सुळे यांनी मतदान सुरू असताना अजितदादांच्या घरी जाऊन मतदारांमध्ये गोंधळ उडवून दिला आहे. यामुळे पवार कुटुंबात आलेली कटूता काहीशी दूर होण्यास मदत होईल. त्याचा त्यांच्या राजकीय भवितव्यावरही परिणाम पडेल. विशेषतः दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात पडतील, असे राजकीय विश्लेषक अभय देशपांडे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. या भेटीचा फायदा सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो. बारामतीचा आतापर्यंतचा मतदानाचा पॅटर्न लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असा राहिला आहे. हा पॅटर्न ब्रेक करण्यासाठी अजित पवार गत महिनाभर संघर्ष करत होते. पण या भेटीमुळे निश्चितपणे लोकांना पुन्हा जुन्या पॅटर्नकडे वळावेसे वाटेल. असे झाले तर काहीही आश्चर्य वाटणार नाही. लगेच त्याचे सर्वत्र परिणाम होणार नाहीत. पण सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबातील कटूता दूर करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांना फायदा होऊ शकतो, असेही अभय देशपांडे यावेळी बोलताना म्हणाले.