मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु झाली असतांना आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय अभिजीत पाटील यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना राज्य शिखर बँकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 442 कोटी रुपयांच्या कर्जापोटी बजावलेली जप्तीची नोटीस मागे घेतली आहे. शिखर बँकेच्या नोटीसीनंतर अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता ते येत्या 5 रोजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रचारार्थ मेळावा घेणार आहेत.
शिखर बँकेने 442 कोटी रुपयांच्या कर्जापोटी अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जप्तीची नोटीस बजावली होती. त्यानंतर या कारखान्यासह त्याच्या गोदामाला सील ठोकण्यात आले होते. या कारवाईमुळे घाबरलेल्या अभिजीत पाटील यांनी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी साखर कारखाना वाचवण्यासाठी आपली कोणत्याही पक्षात जाण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले होते. तेव्हाच ते भाजपत जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते या पार्श्वभूमीवर शिखर बँकेने आपली नोटीस मागे घेत त्यांना दिलासा दिला आहे.
शिखर बँकेने आपली नोटीस मागे घेतल्यानंतर आता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गोदामांना लावण्यात आलेले सील काढण्यात येणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कारखान्याला सील ठोकण्यापूर्वी अभिजील पाटील सोलापूर लोकसभेत महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करत होते. पण अचानक त्यांच्या कारखान्याला जप्तीची नोटीस मिळाली आणि त्यांच्यावर भाजपसाठी काम करण्याची वेळ आली. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अभिजीत पाटील यांनी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी फडणवीसांना भाजप उमेदवारांसाठी घेण्यात येणाऱ्या मेळाव्याचे निमंत्रणही दिले होते. त्यानुसार 5 मे रोजी दुपारी 1 वा. फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा मेळावा होणार आहे.