मुंबई : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी आता राज्यात आम आदमी पक्ष मोठ्या प्रमाणात सक्रीय झाला असून नुकतेच राज्यात तलाठी, वनविभाग व पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची विशेष तपास यंत्रणेमार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे निर्देश द्या, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दाखल घेतली. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी दाखल केलेल्या या याचिकेची मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने सुनावणी १० जानेवारीला निश्चित केली.
राज्यात मागील काही महिन्यांपासून नोकरभरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा सुरू आहे. काही संघटित टोळ्या प्रत्येक भरतीमध्ये पेपर फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा, अशी मागणी करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीतर्फे अॅड. मनोज पिंगळे यांनी याचिका दाखल केली आहे.
मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलची भरती, वनविभाग, मुंबई पोलीस दलातील तसेच तलाठी भरती प्रक्रियेतील पेपर फुटले आहेत. याप्रकरणी केवळ एफआयआर नोंदवण्यात आला. मात्र पुढे कारवाई केलेली नाही. तलाठ्याच्या ४६४४ पदांसाठी दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले. घोटाळ्याचा उमेदवारांना मोठा फटका बसला आहे, त्यामुळे या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश द्या, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.