सुरत: वृत्तसंस्था
छाननीवेळी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर अन्य उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने सुरतचे भाजप उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारधी यांनी दलाल यांच्या विजयाची घोषणा करत त्यांना प्रमाणपत्र दिले.
ही मॅच फिक्सिंग आहे. काँग्रेसच्या कुंभाणी यांचा अर्ज बाद केल्यानंतर आयोगाने काँग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही अर्ज बाद केला. सूरतमधील रोषाला भाजप घाबरल्याने अशी मॅच फिक्सिंग केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे जयराम रमेश यांनी केला.
गुजरातमधील सर्व २६ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान आहे. त्यासाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. सुरत मतदारसंघातील बसपाचे प्यारेलाल भारती, तीन छोटे पक्ष व चार अपक्षांनी आपला अर्ज मागे घेतला.
तत्पूर्वी छाननीवेळी काँग्रेसचे नीलेश कुंभाणी यांच्या अर्जावरील सूचकांच्या स्वाक्षरी बनावट आढळल्याने अर्ज बाद ठरविला होता. कुंभाणी यांच्याऐवजी डमी उमेदवार असलेले सुरेश पडसाला यांचाही अर्ज बाद झाला होता. त्यामुळे भाजपचे मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले. त्यामुळे गुजरातमध्ये आता केवळ २५ जागांसाठी मतदान होईल