ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महिलांवरील अत्याचार रोखण्यास भाजप सरकार अपयशी ; सुप्रिया सुळे !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील गुन्हेगारीच्या आकडेवारीमध्ये महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली असून, ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केली. महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी महिन्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यव्यापी दौरा होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रवादी भवन येथील महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, खडसे यांचा राज्यव्यापी दौरा जानेवारीपासून सुरू होणार आहे. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार आदी मुद्दयांसह स्थानिक लोकांच्या आणि महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम या राज्यव्यापी दौऱ्याच्या माध्यमातून होणार आहे.

सुळे पुढे म्हणाल्या, राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार महिलांवर अन्याय करत आहे. विरोधी खासदारांचे निलंबन केल्यानंतर भाजप सरकारने संसदेत काही नवीन कायदे आणले आहेत, ही बाब अतिशय चिंताजनक आहे. या नवीन आणलेल्या कायद्यात टेलिकॉम कायद्याचाही समावेश आहे. या कायद्यामुळे सरकारला कोणाचेही फोन टॅप करता येणार आहेत. त्यामुळे लोकांचे खाजगी आयुष्य पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, इंडिया आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. इंडिया आघाडीमधील जागावाटप लवकरच जाहीर होईल. येत्या १५ ते २० दिवसांत जागावाटप निश्चित केले जाईल, असा दावा सुळे यांनी या वेळी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!