ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अपक्ष खासदाराला भाजपच्या मंत्र्यांनी दिली मोठी ऑफर !

सांगली : वृत्तसंस्था

राज्यातील सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपकडून पक्षात येण्याची मोठी ऑफर मिळाली आहे. खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या ही वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्याही विकासालाही गती मिळेल, त्यामुळे त्यांनी भाजपसोबत यावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

राजकारणामध्ये वर्तमानावर चालायचे असते, वर्तमानामध्ये खासदार विशाल पाटील यांच्या हाती अजून चार वर्ष दोन महिने बाकी आहेत, त्यामुळे त्यांच्या या शिल्लक राहिलेल्या कालावधीचा आम्ही विचार करतो. जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली संख्या देखील वाढते, त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील विकासाच्या कामाला त्यांना जे काय करायचं आहे. त्याला देखील सोपं जाईल, म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर पुन्हा एकदा देत आहोत, त्याचा त्यांनी विचार करावा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या भाजपमध्ये येण्याच्या ऑफरवर खासदार विशाल पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या भाजपमध्ये येण्याच्या ऑफरवर खासदार विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी ज्या पद्धतीने संसदेत प्रश्न मांडतोय, ही चंद्रकांत दादांना माझ्या कामाची पद्धत आवडली असेल. मला सतत भाजप प्रवेशाची ऑफर येत असेल तर मी चांगलं काम करतोय असे मी समजतो, पण भाजपप्रवेशाबाबत मी कोणताही विचार करत नाही. मी आता कायद्यानेच दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाही. सर्व लोकप्रतिनिधीनी पक्ष गट तट बाजूला ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विचार करतोय हे माझं धोरण आहे, अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी दिली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने येथे विजय मिळवला होता. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत विशाल पाटलांनी काँग्रेसची साथ न मिळाल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!