अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : अक्कलकोट नगर परिषदेसाठी भाजपकडून स्वीकृत सदस्य पदासाठी तीन नावे पुढे आली असून भाजपचे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीण शहा, अशोक जाधव व संजय घोडके यांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले आहेत. या तिन्ही अर्जांवर अंतिम निर्णय येत्या १२ तारखेला अक्कलकोट नगर परिषदेत होणाऱ्या विशेष सभेत घेतला जाणार आहे.
मागील कार्यकाळात स्वीकृत सदस्यांची संख्या दोन होती, मात्र यंदा एक सदस्य वाढविण्यात आल्याने तीन स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. अक्कलकोट नगर परिषदेची एकूण सदस्य संख्या २५ असून त्यापैकी २२ सदस्य भाजपचे, दोन काँग्रेसचे व एक शिवसेना (शिंदे गट)चा आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने तिन्ही स्वीकृत सदस्य भाजपचेच असतील,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान,मैंदर्गी नगर परिषदेतही अशीच परिस्थिती असून तेथे भाजपकडून सिद्धाराम जकापुरे व जाफर बेपारी यांना स्वीकृत सदस्य पदासाठी संधी देण्यात आली आहे.पक्षाची शिफारस होताच निवड झालेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
नामनिर्देशन अर्ज भरताना अक्कलकोटचे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, भाजप मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, गटनेते यशवंत धोंगडे, शिवशरण जोजन, रमेश कापसे, योगिनाथ बाजारमठ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपने स्वीकृत सदस्य निवडीतून नगर परिषदेत आपली पकड अधिक मजबूत केल्याचे चित्र दिसून येत आहे.