नागपूर वृत्तसंस्था : संपूर्ण राज्यात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना, राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक ठिकाणी युती-आघाड्यांमुळे समीकरणे बदलली असली, तरी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र दिसत आहे. याचा थेट फटका पक्षांच्या कामगिरीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नागपुरात भाजपने बंडखोरांविरोधात कठोर भूमिका घेत थेट 32 जणांचे पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन केले आहे. यामध्ये भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांच्यासह माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण यांचाही समावेश आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणे, अपक्ष किंवा अन्य पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढवणे आणि अशा उमेदवारांना पाठिंबा देणे, या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी निलंबनाचे आदेश काढत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भाजपचे काही लोक अपक्ष म्हणून, तर काही अन्य पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. काही कार्यकर्ते त्यांना उघड पाठिंबा देत आहेत. त्यामुळे शिस्तभंगाच्या कारणावरून शहरातील 32 जणांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.”
भाजप हा अनुशासित पक्ष असून, पक्षविरोधी कारवायांना अजिबात थारा दिला जाणार नाही, असेही तिवारी यांनी ठणकावून सांगितले. नागपुरातील या कठोर कारवाईमुळे राज्यातील इतर महापालिकांमध्येही बंडखोर उमेदवारांवर अशाच प्रकारची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या निर्णयामुळे भाजपला कितपत फायदा होईल, की उलट नुकसान सहन करावे लागेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.