मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या निकालांमधूनच भाजपने राज्यात जोरदार मुसंडी मारल्याचे स्पष्ट होत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांतील यशानंतर आता महापालिका निवडणुकांमध्येही भाजपने वर्चस्व सिद्ध केल्याचे चित्र समोर आले आहे. निकाल जसे जसे हाती येत आहेत, तसे भाजपचा विजयाचा आलेख अधिकच भक्कम होताना दिसत आहे.
आतापर्यंतच्या कलानुसार, राज्यातील तब्बल 29 पैकी 26 महापालिकांमध्ये भाजप आघाडीवर आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, सांगली, कल्याण-डोंबिवली यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटाची युती आघाडीवर असून, विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासह अजित पवार गटालाही जोरदार हादरा दिला आहे. तर मुंबईत ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती पिछाडीवर फेकली गेली आहे.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यातील महापालिका निवडणुकांत भाजपचे तब्बल 741 उमेदवार आघाडीवर असून, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे 190 उमेदवार आघाडीवर असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर काँग्रेसचे 154 उमेदवार आघाडीवर आहेत.
मुंबई महापालिकेत भाजप 66 जागांवर आघाडीवर असून, नवी मुंबईतही भाजपने 66 जागांवर आघाडी घेतली आहे. ठाण्यात मात्र शिवसेना शिंदे गटाने आघाडी घेतली असून, त्यांच्या 20 उमेदवारांनी मुसंडी मारली आहे, तर भाजप 15 जागांवर पुढे आहे. नाशिकमध्ये भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे.
पुण्यात भाजप पुन्हा एकदा एकहाती सत्तेकडे वाटचाल करत असून, तब्बल 48 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने विक्रमी कामगिरी करत 70 जागांवर आघाडी घेतली आहे. पनवेलमध्ये 22, कल्याण-डोंबिवलीत 17, मिरा-भाईंदरमध्ये 32, उल्हासनगरमध्ये 14, तर भिवंडी-निजामपूरमध्ये 9 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
या निकालांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचा भगवा प्रभाव अधिकच मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी राजकीय समीकरणांसाठी हे निकाल निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.