ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘काँग्रेसमुक्त नव्हे काँग्रेसयुक्त भाजप’ होतोय ; ठाकरे गटाचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यसभेच्या निवडणुकीवरुन ठाकरे गटाने भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्यांना थेट राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाते हीच मोदींची गॅरंटी आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. तसेच ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या नादात वेडापिसा झालेला भाजप त्याच काँग्रेसशिवाय एक इंचही पुढे जाऊ शकत नाही, हेच या साऱ्यामधून सिद्ध होत असल्याचे टीकाही ठाकरे गटाने मुखपत्रातून केली आहे.

काँग्रेस सोडा आणि राज्यसभेत जा, भाजपचा मूलमंत्र “काँग्रेसमुक्त भारत’च्या धुंदीत आकंठ बुडालेला भाजप आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’ होत असल्याच्या दारुण वास्तवाचीही जाणीव या मंडळींना राहिलेली नाही. काँग्रेस सोडा आणि राज्यसभेत जा, हा सध्या भाजपचा मूलमंत्र बनला आहे व हिच मोदींची गॅरंटी बनली आहे. महाराष्ट्रातील अशोक चव्हाण आणि हिमाचल प्रदेशातील हर्ष महाजन हे काँग्रेसजन याच गॅरंटीचे लाभार्थी ठरले आहेत. ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या नादात वेडापिसा झालेला भाजप त्याच काँग्रेसशिवाय एक इंचही पुढे जाऊ शकत नाही, हेच पुन्हा सिद्ध झाले आहे,” असे भाष्य ठाकरे गटाने केले आहे.

काँग्रसचे नेते भाजपमध्ये जाताच थेट राज्यसभेवर “कधी ‘खोके’ द्यायचे, तर कधी थेट भाजपच्या उमेदवारीचा ‘जॅकपॉट’ द्यायचा. आपल्या जुन्या नेते-कार्यकर्त्यांचा हक्क डावलून आयात भ्रष्ट नेत्यांना स्वतःच्या कोटय़ातून उमेदवारी द्यायची. ते शक्य नसेल तेथे ‘अतिरिक्त’ उमेदवारी देत घोडेबाजार करून त्यांना निवडून आणायचे. आताच्या राज्यसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात हेच घडले.

हिमाचलमध्ये काँग्रेसच्या अभिषेक सिंघवी यांना ‘धक्का’ देणारे हर्ष महाजन आज भाजपचे असले तरी काँग्रेसचेच जुने नेते आहेत. महाराष्ट्रातून भाजपने स्वतःच्या कोटय़ातून राज्यसभेवर पाठविलेले अशोक चव्हाण हेदेखील काँग्रेसचेच माजी मुख्यमंत्री आहेत. आदल्या दिवशी त्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेचे दरवाजे खुले केले गेले. देशातील ज्या-ज्या राज्यांत काँग्रेसची पाळेमुळे आहेत, त्या-त्या राज्यांतील काँग्रेसची मंडळी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये घालून ‘स्वच्छ’ केली जात आहेत,” असे ठाकरे गटाने म्हटलं आहे.
‘शून्य विरोधी पक्ष’ धोरण “मागील दहा वर्षांत विरोधी पक्षांतील तब्बल 740 आमदार, खासदारांनी केवळ धाक आणि दबावापोटी भाजपमध्ये प्रवेश केला,’ असा धक्कादायक दावा झारखंड मुक्ती मोर्चाचे एक पदाधिकारी सुप्रियो भट्टाचार्य यांनी गेल्याच आठवडय़ात केला. त्यातील सर्वाधिक आमदार, खासदार काँग्रेस पक्षाचे आहेत. एकीकडे ‘काँग्रेसमुक्त भारत’ आणि दुसरीकडे ‘शून्य विरोधी पक्ष’ असे दुहेरी धोरण मोदी सरकार कसलीही चाड न बाळगता राबवीत आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांतील आमदार-खासदारांची भाजपला आलेली सूज याच धोरणाचा परिणाम आहे,” असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!