मुंबई : वृत्तसंस्था
केंद्रातील सत्ताधारी भाजपने 400 पारची दिलेली हाक म्हणजे देशाचे संविधान बदलण्याचा डाव आहे, असा घणाघात छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना केला आहे. काहीजण छत्रपती घराण्यावर टीका करत आहेत. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज, ताराबाई राणी साहेब, छत्रपती शाहू महाराज यांच्यावरही टीका झाली. या टीकेमुळे त्यांना फरक पडत नसेल, पण मला पडतो, असा इशाराही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात शिवशाहू निर्धार सभा झाली. या सभेत बोलताना छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपचा 400 पारचा नारा म्हणजे धोक्याची घंटा आहे. त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलायचे आहे, असे ते म्हणाले.
संभाजीराजे पुढे बोलताना म्हणाले की, 400 पारच्या नाऱ्यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? 400 पार म्हणजे धोक्याची घंटा. त्यांना एकहाती सत्ता हवी असेल तर ते 272 का म्हणत नाहीत. संसदेत एकूण सदस्य 543 आहेत. त्याचे निम्मे 272 होतात. तु्हाला 272 म्हणणे अवघड वाटत असेल, तर 300 म्हणा. पण चारशेच का? 400 पार म्हणजे त्यांना संविधान बदलायचे आहे. त्यांना कायदा दुरुस्ती नाही, तर कायदाच बदलायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्याला दिले आहे, ते मोडून काढायचे आहे. त्यासाठी त्यांना 400 हून जास्त जागा हव्या आहेत. ही ऐतिहासिक व दिशादर्शक निवडणूक आहे. त्यामुळे सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे, असे संभाजीराजे म्हणाले.