नागपूर : प्रतिनिधी
चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठी आवश्यक संख्याबळ जमवण्यात यश आले आहे, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा भाजप नेत्यांचा दावा म्हणजे केवळ “हवेतील पतंगबाजी” असल्याचा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन करणे आणि काँग्रेसचा महापौर बसवणे ही आमची प्राथमिकता आहे. चंद्रपुरात कुणालाही तोडफोड करणे किंवा नगरसेवक पळवणे यासाठी कोणताही स्कोप नाही. त्यामुळे कोणी कितीही दावे केले तरी चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार, असा ठाम विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपचे काही नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे संकेतही दिले.
चंद्रपुरातील जनतेने काँग्रेसला स्पष्ट कौल दिला असल्याने जनतेच्या अपेक्षांना साजेसा काँग्रेसचा महापौर होणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले असून, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने चंद्रपुरातही त्यांना सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर पदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला असला तरी तो त्यांचा अधिकार असून, या संदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपुरात काँग्रेस निष्ठावंत आणि अनुभवी नगरसेवकाला महापौर करण्याची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर १९ व २० जानेवारी रोजी मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी बंदची अधिसूचना पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी गुजराती भाषेत काढल्यावरूनही वडेट्टीवार यांनी टीका केली. ही केवळ सुरुवात असून पालघरपासून गुजराती भाषेचा शिरकाव सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचा मुंबईत महापौर होणार म्हणजे मुंबई कुणाच्या इशाऱ्यावर चालणार, हे स्पष्ट असल्याची टीका त्यांनी केली.
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे राज्य सरकारकडून लाखो कोटींचे सामंजस्य करार होत असताना देशातील कंपन्या परदेशात जाऊन करार करत असल्याचा काय उपयोग, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. परदेशी कंपन्यांची प्रत्यक्ष महाराष्ट्रात गुंतवणूक येणार की नाही, यावर सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.