सोलापूर : वृत्तसंस्था
भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती मात्र त्यात राज्यातील एकही उमेदवाराचे नाव नसल्याने अनेक ठिकाणी भाजपकडे उमेदवार नसल्याची जोरदार चर्चा असतांना आता सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी सांगितली आहे.
पाठीमागच्या दोन निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून त्यांनी गावभेटी, सभा घेण्यास सुरूवात केली आहे.
अशातच आता महायुतीकडूनही प्रणिती शिंदेंच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचे नाव आघाडीवर असून राम सातपुते यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. भाजपच्या दुसऱ्या उमेदवार यादीमध्ये राम सातपुते यांचे नाव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.