ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटच्या उपनगराध्यक्ष निवडीत भाजपचे ‘धक्का तंत्र’

बंटी उर्फ ऋतुराज राठोड यांची वर्णी, कल्याणशेट्टी यांनी घेतला नगराध्यक्षचा पदभार

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : अक्कलकोट नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र याचवेळी झालेल्या उपनगराध्यक्ष निवडीत भाजपने अनपेक्षित निर्णय घेत बंटी उर्फ ऋतुराज राठोड यांची वर्णी लावल्याने राजकीय वर्तुळात या ‘धक्का तंत्रा’ची जोरदार चर्चा सुरू झाली. या निर्णयामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांच्या आशा मावळल्या.

भाजपचे मिलन कल्याणशेट्टी यांनी नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार स्वीकारल्यानंतर पार पडलेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदी राठोड यांची निवड करण्यात आली.या निवडीच्या माध्यमातून भाजपने अक्कलकोट नगर परिषदेत उपनगराध्यक्ष पदावर प्रथमच बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देत सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र स्पष्ट झाले.

नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्यानिमित्त अक्कलकोट नगर परिषद कार्यालयासह भाजप कार्यालयाची आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. शहरात
प्रथमच नगर परिषद आणि पक्ष कार्यालयाला एकाचवेळी फुलांची सजावट केल्याने पदग्रहण सोहळ्याचा उत्साह सर्वत्र जाणवत होता. भाजप कार्यालयापासून नगर परिषद कार्यालयापर्यंत नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांची सर्व नगरसेवकांसह मिरवणूक काढण्यात आली.

यानंतर प्रशासक म्हणून कार्यरत असलेले मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार कल्याणशेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला. याचवेळी भाजपतर्फे प्रवीण शहा, अशोक जाधव आणि संजय घोडके यांना स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष सभा पार पडली.

उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. भाजपकडून बंटी (ऋतुराज) राठोड तर काँग्रेसकडून मुस्तफा बळोरगी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत राठोड यांना २३ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार बळोरगी यांना केवळ ३ मते मिळाली. पहिल्याच सभेत शहराच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा झाली. नगरसेवक महेश इंगळे व यशवंत धोंगडे यांनी विकासाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या, तर गटनेतेपदी धोंगडे यांची निवड करण्यात आली.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांना सर्वांचा पाठिंबा मिळत असल्याने अक्कलकोटचे चित्र आगामी काळात निश्चितच बदलणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी प्रशासकीय काळात झालेल्या विकासकामांची माहिती दिली. कार्यक्रमानंतर नगर परिषद कार्यालयाबाहेर व शहरातील विविध चौकांत गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला.

निवडीच्या कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, शिवशरण जोजन, मल्लिनाथ स्वामी, राष्ट्रवादीचे नेते दिलीप सिद्धे, सागर कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे, अप्पासाहेब पाटील, नन्नू कोरबू, अविनाश मडीखांबे, तम्मा शेळके, सद्दाम शेरीकर, नवीद डांगे, कांतू धनशेट्टी, सुनील खवळे, सुनील सिद्धे, रमेश कापसे, अंकुश चौगुले यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर परिषदेच्या उंबरठ्याला नतमस्तक होत पदभार स्वीकारला
नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना मिलन कल्याणशेट्टी यांनी नगर परिषद कार्यालयाच्या उंबरठ्याला नतमस्तक होऊन प्रवेश केला. अतिशय तरुण वयात आणि सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या नगराध्यक्षाने दाखविलेल्या या कृतज्ञतेच्या भावनेने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.

मी नगराध्यक्ष नाही, अक्कलकोटचा सेवक
नगराध्यक्षपद स्वीकारल्यानंतर बोलताना मिलन कल्याणशेट्टी म्हणाले,मी स्वतःला नगराध्यक्ष नव्हे तर अक्कलकोटचा सेवक समजतो. येत्या पाच वर्षांत तीर्थक्षेत्र अक्कलकोटचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असेल. शिर्डीच्या धर्तीवर शहराचा विकास करताना कोणतीही तडजोड न करता, सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!