सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये अनेक पक्ष प्रवेश सुरु असतांना आता तानाजी सावंत यांचे बंधू सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर सोलापुरात शिवसेनेला खिंडार पडणार हे निश्चित झालं आहे.
सोलापुरातील शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या शिवाजी सावंत यांनी गटबाजीला कंटाळून राजीनामा देत असल्याचं सांगितलं. त्यांच्यासह सोलापूर शहर जिल्ह्यातील शिवसेनेच्या 40 पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. हे सर्व पदाधिकारी शिवाजी सावंत यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थित गणपतीनंतर पक्षप्रवेश करणार असल्याचे शिवाजी सावंत यांनी सांगितले. याशिवाय पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
आगामी स्थानीक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. याचदरम्यान आता भाजपची ताकद आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मित्र पक्षातीलच नेतेमंडळीला गळाला लावण्याचे काम सुरू आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढतानाचे एकूणच चित्र दिसून येत आहे.