मारुती बावडे
अक्कलकोट : वर्षाच्या शेवटी गाजलेला महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद, बेकायदा मांगुर प्रकल्प, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान, आमदार कल्याणशेट्टी यांना मिळालेले जिल्हाध्यक्षपद तसेच स्वामी समर्थ कारखान्याला मिळालेली नवंसंजीवनी यासारख्या अनेक घटनांनी सरते २०२२ हे वर्ष आठवणीत राहिले. भाजप आणि काँग्रेस साठी हे वर्ष ‘कही खुशी कही गम ‘अशाच पद्धतीने गेले.
वर्षाच्या प्रारंभी कुरनुर धरणाजवळ बेकायदा मांगुर प्रकल्प सुरू होता. तो बाळासाहेब मोरे व शेतकऱ्यांनी हाणून पाडला. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तालुक्यात पहिल्यांदा हननुर येथे बैलगाडा शर्यत घेतली.तीही लक्षवेधी ठरली. माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा ८ एप्रिलचा वाढदिवस जंगी करण्यात आला. या वाढदिवसाला महाविकास आघाडीचे अनेक मंत्री उपस्थित राहिले. यातुन काँग्रेसला बळ मिळाले.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले त्याचे पडसाद तालुक्यात तीव्र उमटले. सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ काही ग्रामपंचायतीने कर्नाटकात जाण्याचा ठराव केला. जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका यावर्षी होणे अपेक्षित होते पण या निवडणुका वर्षभर रेंगाळत गेल्या.गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांचा राष्ट्रवादी प्रवेश चांगला चर्चेत राहिला.
विधानसभेमध्ये आमदार कल्याणशेट्टी यांनी शांभवी हॉटेलचा विषय उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.शेतकऱ्यांना हे वर्ष अतिशय नुकसानीचे ठरले.कुरनूर धरणातील अतिरिक्त पाणी नियोजन पद्धतीने खाली सोडून पूरस्थिती टाळली गेली.यात तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांचे नियोजन चांगले होते.दुधनी बाजार समिती अंतर्गत माजी आमदार म्हेत्रे यांनी नागणसूर उपबाजार समितीची निर्मिती करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या दिव्यांग आणि निराधार लोकांसाठी सुरू केलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेला अमोलराजे भोसले यांनी व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.तालुक्यातील अनेक रस्त्यांसाठी व पाणीपुरवठा योजनेसाठी राज्यात सत्ता असल्याने आमदार कल्याणशेट्टी यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणला.
या वर्षामध्येच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशभरात भारत जोडो यात्रा काढली. यात माजी आमदार म्हेत्रे यांच्यासह शीतल म्हेत्रे, लक्ष्मी म्हेत्रे आणि प्रथमेश म्हेत्रे संपूर्ण म्हेत्रे कुटुंब सहभागी होऊन त्यांची भेट घेतली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये सर्व पक्ष सहभागी होऊन गावांमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. तीन दिवस तालुक्यात स्वातंत्र्याचा जागर करण्यात आला.हा उपक्रम देखील सरत्या वर्षात लक्षवेधी ठरला.मध्यंतरी रस्त्याच्या निधीवरून आमदार कल्याणशेट्टी आणि म्हेत्रे यांच्यामध्ये गंभीर आरोप प्रत्यारोप झाले.
यावरूनही राजकीय वातावरण तापले गेले. याच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे कोसळले. याचे पडसाद तालुक्यात देखील उमटले आणि शिवसेनेमध्ये दोन गट पडले. ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश केला. राजकीय दृष्ट्या आमदारकीनंतर कल्याणशेट्टी यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सानिध्यात राहून जिल्हाध्यक्ष मिळविले. त्याशिवाय स्वामी समर्थ कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद होता. तो या सरत्या वर्षामध्ये सुरू होण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे शेतकरी सभासद वर्गातून माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत झाले.
दोन महिन्यापूर्वी अतिवृष्टी आणि पीक विम्याचा निधी मिळवून दिल्याबद्दल माजी आमदार म्हेत्रे यांचा शेतकऱ्यांनी अनोखा दुग्धाभिषेक केला. ही घटना देखील राज्यभर गाजली. फत्तेसिंह शिक्षण संस्थेची निवडणूक झाली. यात सत्ताधाऱ्यांना जोरदार हादरा देत माजी आमदार कै.बी.टी माने यांचे पुत्र राजीव माने यांच्या पॅनलने बाजी मारली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही म्हेत्रे आणि कल्याणशेट्टी यांच्यामध्ये दावेप्रतिदावे होऊन सत्तेसाठी तीव्र संघर्ष होताना पाहायला मिळाला.
या वर्षभरात प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला तर ट्रॉमा केअर सेंटर, उजनीचे पाणी हे अद्याप दूरच राहिले. या वर्षात ही काही कामे झाली नाहीत.बस स्टॅन्डची दुरावस्था वारंवार माध्यमातून समोर आली पण अद्यापपर्यंत या कामाला सुरुवात झाली नाही यातून वर्षभर ओरड होत राहिली.नव्या वर्षात तरी या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.
कारखान्याची चिमणी ‘लक्षवेधी’
सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीवरून अक्कलकोट तालुक्यातील सर्व पक्ष नेते एकवटले. सभा झाली तसेच मोर्चामध्येही चिमणीच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी मोठा सहभाग घेतला.अक्कलकोट तालुक्यातील शंभर पेक्षा अधिक गावाने आणि सोसायटीने एकमुखाने जाहीर पाठिंबा देत सिद्धेश्वर कारखान्याला पाठिंबा दिला. हा विषय देखील मोठा चर्चेचा ठरला.