ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कमांडोंची धाडसी कारवाई : जहाजातून १५ भारतीयांची सुटका !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोंनी शुक्रवारी धाडसी कारवाई करत अरबी समुद्रातील एक अपहृत जहाज सागरी चाच्यांच्या तावडीतून सोडवले. या जहाजाच्या २१ सदस्यीय चालक दलात १५ भारतीयांचा समावेश आहे. सर्वजण सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे.

लाइबेरियाचा राष्ट्रध्वज असलेल्या ‘एमव्ही लीला नॉरफोक’ नामक मालवाहू जहाजाचे गुरुवारी संध्याकाळी अपहरण झाले होते. जहाजाच्या चालक दलाने यूके मेरिटाईम ट्रेड ऑपरेशन्स नामक संस्थेला याबाबत माहिती दिली होती. पाच ते सहा अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी जहाजावर प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. भारतीय नौदलाला याबाबत समजताच अरबी समुद्रात मालवाहू जहाजांच्या सुरक्षेसाठी गस्तीवर असलेल्या आयएनएस चेन्नई या युद्धनौकेचा मार्ग बदलून एमव्ही लीला नॉरफोकच्या मदतीसाठी रवाना करण्यात आले.

सागरी गस्तीवर असलेले पी८आय विमान आणि लांब पल्ल्याचे प्रेडेटर एमक्यू९बी ड्रोन देखील टेहळणीसाठी पाठवण्यात आले. हे विमान आणि ड्रोन सातत्याने जहाजावर घिरट्या घालत त्याच्यावर पाळत ठेवत होते आणि त्याची माहिती आयएनएस चेन्नईला कळवत होते. शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास भारतीय युद्धनौका या मालवाहू जहाजाजवळच पोहोचली. अपहरणकत्यांना तत्काळ आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले. परंतु सागरी चाच्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने आयएनएस चेन्नईवरील मरीन कमांडो या मालवाहू जहाजावर दाखल झाले. नौदलाच्या जवानांनी जहाजावर नियंत्रण मिळवले आणि अपहरणकर्त्यांच्या तावडीतून १५ भारतीयांसह २१ जणांची सुखरूप सुटका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!