जळगाव : वृत्तसंस्था
काहींना बहिणीचे प्रेम समजतच नाही. अवघ्या पंधराशे रुपयांमध्ये बहिणींच्या स्नेहाची किंमत होऊच शकत नाही. आम्ही फक्त बहिणींना थोडा हातभार लावण्याचे काम करीत आहेत. जे भाऊ पैसे परत घेण्याची भाषा करतात, त्यांना ही माहिती नाही की बहिणीकडून भाऊबीजेची ओवाळणी परत घेतली जात नाही. असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. मोदींनी महिलांच्या शक्तीच्या विकासासाठी महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरूवात केली आहे. यासाठीच पंतप्रधान येत्या रविवारी (दि.25) रोजी जळगाव जिल्ह्यात दाखल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील सागर पार्क मैदानावर जिल्हा प्रशासनातर्फे मंगळवारी महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी ते म्हणाले की, सावत्र भावांपासून बहिणीने सावध राहावे लागेल. कारण निवडणूक येत राहतील जात राहतील पण माझ्या बहिणींची अमूल्य मते मिळो किंवा न मिळो परंतु ही योजना मात्र बंद होणार नसल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला. राज्यात एक कोटी 35 लाख बहिणींनी या योजनेमध्ये सहभाग नोंदविला आहे. मात्र 35 लाख बहिणींचे अजून खात्यांची आधार सिडींग झालेले नसल्याने त्यांनी ते आधार सिडींग करून घेण्यासाठी यावेळी आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर बहिणींमुळेच तोट्यात असलेली आमची एसटी ही फायद्यात आलेली असल्याचे नमूद केले.
विरोधकांना टोला लावताना ते म्हणाले की, खोटे सांगून महाविकास आघाडीचे काही लोक खोटे बोलून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र या योजना बंद होणार नाहीत आणि निवडणुकीपुरते ही योजना नाहीत. जळगाव जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.