ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बस व चारचाकीचा अपघात : दोन जण ठार

पंढरपूर : वृत्तसंस्था

राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने कारमधील दोनजण ठार झाले. हा भीषण अपघात रविवारी (दि.२४) सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास शहरातील चंद्गभागा बसस्थानकासमोर घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर सुखदेव सावंत (वय ५० रा. कोळेगाव ता. माळशिरस) व बापू केरबा वाघमोडे (वय ३८, रा. तिरवंडी, ता. माळशिरस) अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. पंढरपूर आगाराची शिवशाही बस (एम.एच. ०६/बी.डब्ल्यू. ४२९८) ही रविवारी दुपारी १२ वाजता स्वारगेट येथून पंढरपूरकडे येत होती. सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास ही बस येथील चंद्रभागा बसस्थानकासमोर आली असताना समोरील सरगम चौकाकडून लाल रंगाची स्वीप्ट कार (एम.एच.१२/एफ.यू. ३६०८) कॉलेज क्रॉस चौकाकडे निघाली होती. यादरम्यान, कार चालक सावंत व त्याच्या बाजूला बसलेले वाघमोडे हे मोबाईलमध्ये पाहत होते. हयगयीने व बेदरकारपणे चालविली जात असलेली ही कार दुकीच्या दिशेने येऊन समोरून एस.टी. बसला धडकली. ही धडक इतकी जोराची होती की कारचा समोरून अक्षरशः चक्काचूर झाला. तसेच बसचेही मोठे नुकसान झाले.

या अपघातात कार चालक सावंत हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले, तर वाघमोडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद बस चालक राहूल बाबुराव कांबळे (रा.येणकी, ता. मोहोळ) यांनी शहर पोलिसांत दाखल केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेगडकर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!