मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात समाजामध्ये गोंधळ आणि अराजक निर्माण झाले आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधण्याचे आवाहन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांना सोबत घेऊन फडणवीसांनी या विषयी पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी परिस्थिती मांडायला हवी, असे देखील ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे पत्रकार परिषदेला घाबरु नये, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.
आज सर्व समाज संभ्रमात आहे. हे या राज्याला शोभत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा सक्षम आणि महान माणूस असताना, सक्षम नेतृत्व असताना त्यांनी तरी समाजाचा संभ्रम दूर करावा, अशा खोचक शब्दात राऊत यांनी या विषयी निशाणा साधला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेण्याचे आवाहन राऊत यांनी केले.
आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली आहे. लातूरमध्ये आत्महत्या झाली आहे. इतर ठिकाणी देखील आत्महत्यांच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन खुलासा करण्याचे आवाहन राऊत यांनी केले. मात्र, ते जाता-जाता मीडियासमोर बोलतात तसे नाही. तर त्यांनी या विषयावर पत्रकार परिषद घ्यायला हवी आणि जनतेच्या मनातील शंका आहेत, त्या दूर करायला हव्या.
आरक्षणाबाबत मराठा असेल ओबीसी असेल किंवा इतर समाजात देखील त्या संदर्भातील प्रश्नांना त्यांनी सरकारच्या वतीने अगदी रोखठोक उत्तर आणि पुराव्यासह विषय मांडले पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली. एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला आहे. तुम्ही या विषयी भूमिका घेतली आहे. या विषयावर तुम्ही भविष्यात मते मागणार आहात. मग या विषयावर पत्रकार परिषद घ्या, तुमच्याकडे पत्रकार परिषद घेण्यासाठी जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवनात जागा देतो. या पत्रकार परिषदेची सर्व व्यवस्था आम्ही करू, पत्रकारांचे चहापान आम्ही करू, मात्र तुम्ही पत्रकार परिषद घ्या, असे आवाहन देखील त्यांनी केली.
ज्या पद्धतीचा संघर्ष कॅबिनेट मध्ये सुरू आहे, उद्या मंत्र्याचा खून झाला तरी मला आश्चर्य वाटणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी मंत्र्यांमधील वादावर निशाणा साधला. मी असे काही बोललो तर मला माओवादी ठरवले जात आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचारामुळे अराजक निर्माण होईल, असे सांगणे देखील माओवाद आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. असे असेल तर जन सुरक्षा कायद्याखाली छगन भुजबळ यांच्यावर कारवाई करणार आहात का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. माझ्यावर कारवाई करण्यासाठी शिंदे गटाचे लोक पोलिस अधिकाऱ्यांना भेटले. नेपाळ प्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील सर्व भ्रष्टाचार टोकावर पोहोचला आहे. त्यामुळे इथल्या भ्रष्टाचारी लोकांनी देखील काळजी घ्यावी, असे मी म्हणालो होतो, असे देखील राऊत म्हणाले.