मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही मराठी भाषेचे कसे तारक आहोत, याचे ढोल वाजवले गेले. मात्र मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भोषेचा दर्जा देण्यासंदर्भातला अध्यादेश काढला नाही. तर महाराष्ट्र सरकार देखील त्या संदर्भात पाठपुरावा करताना दिसत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मोदींनी ट्विटरवर घोषणा केली आणि राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पेढे वाटले. मात्र, प्रत्यक्षात अजूनही अध्यादेश निघाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा हा केवळ निवडणुकीपूर्ती ‘जुमला’ होता का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची जी घोषणा मोदी सरकारने केली त्याबाबत नैराश्य दिसत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
ज्या – ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्या – त्या राज्यांमध्ये गो हत्या होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. भाजप सरकार असलेल्या राज्यातून सर्वाधिक गो मांस निर्यात केले जात आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष पैसा जमा करत आहे. त्यांना मिळालेल्या पक्ष निधीमध्ये मोठ्या प्रमाणात या पैशांचा देखील समावेश असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. याच पैशातूनच भारतीय जनता पक्ष निवडणुका लढवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.