चांदवड : वृत्तसंस्था
तालुक्यातील खडकजाम येथून नाशिकच्या दिशेने कोंबडी खाद्य घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकला निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी शिवारात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे साडेतीन लाख रुपयांचे ११ टन २५० किलो कोंबडी खाद्य खाक झाले.
सविस्तर वृत्त असे कि, चांदवड तालुक्यातील खडकजाम येथील कोंबडी खाद्याच्या कंपनीतून शुक्रवारी दि.२६ रोजी एम एच १५ जीव्ही ५११९ क्रमांकाच्या ट्रकमधून कोंबडी खाद्य भरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनास शिरवाडे वणी शिवारात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. काहीवेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे ट्रकच्या कॅबिनसह मागील बाजूस आगीने विळख्यात घेतल्याने ट्रकमधील कोंबडी खाद्य आगीत खाक झाले.
यात सगुणा कंपनीच्या साडे तीन लाख रुपयांच्या ११टन २५० किलो कोंबडी खाद्याचे जळून नुकसान झाल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक विरा मुथु यांनी दिली. दरम्यान, पिंपळगाव बसवंत अग्निशमन वाहनाच्या मदतीने अवघ्या काही क्षणात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याप्रसंगी अग्निशमन विभाग प्रमुख अभिजित काशीद, कर्मचारी सुभाष बोंबले, सुनील अहिरे, कल्पेश खोडे, तेजस कुऱ्हाडे आदी कर्मचारी उपस्थित होते.