मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात पावसाळाच्या तोंडावर स्वाइन फ्ल्यूची साथ मुंबईसह राज्यभरात पसरली आहे. १५ जूनपर्यंत राज्यात ४३२ लोकांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समजते, सरकारी वैद्यकीय आकड्यानुसार १५ जणांनी स्वाइन फ्ल्यूमुळे जीव गमावला आहे. दरवर्षी मान्सूनच्या सुरुवातीला मलेरिया, डेंगू, लेप्टो, अतिसार यासारखे साथीचे आजार पसरताना दिसतात. पण यंदा स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णात अचानक वाढ झाल्याने प्रशासनाची सुद्धा डोकेदुखी वाढली आहे. मुंबईसारख्या शहरात रुग्णांची झपाट्याने वाढ होताना दिसते. गेल्यावर्षी सुद्धा स्वाइन फ्लूच्या रुग्णात लक्षणीय वाढ होती. मागील वर्षी ३२ जणांनी स्वाइन फ्ल्यूमुळे जीव गमावला होता.
थांबून थांबून पडणारा पाऊस आणि कडक ऊन या बदलत्या ऋतुचक्रामुळे वातावरण बदलले दिसते याचाच फायदा स्वाइन फ्ल्यूच्या प्रसारासाठी पोषक ठरतोय. मुंबईतील रुग्णालयात जूनच्या सुरुवातीपासून रुग्ण आढळून येतात. यातील काही रुग्णांना गंभीर लक्षणे आढळून आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. एचएन रिलायंस रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती छाबरिया माहिती दिली की साधारण एका आठवड्यात योग्य औषधउपचार केल्यास रुग्णाला आराम मिळतोय. पण तरीही शरीरात थोडा थकवा जाणवतो, काही अल्प प्रमाणात ताप सुद्धा येतो. स्वाइन फ्ल्यूपासून बचाव करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. वरिष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे छाबरिया यांनी सांगितले.
ही आहेत स्वाइन फ्ल्यूची लक्षणे
स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्यास सुरुवातीला तुम्हाला अंग दुखणे, घसा दुखणे, सर्दी होणे, सतत नाक वाहणे, ताप येणे अशी लक्षणे आढळून येतील. स्वाइन फ्ल्यूला H1N1 वायरस नावाने ओळखले जाते. स्वाइन फ्ल्यू साथीचा रोग आहे स्वाइन फ्ल्यू बाधित व्यक्तींच्या संपर्कांत आल्याने रोगांची लागण होवू शकते. लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, हृदय किंवा श्वासांना संबधित गंभीर आजार असणारी व्यक्ती, मधुमेही व्यक्ती यांची विशेष काळजी घेणे यांना स्वाइन फ्ल्यूचा सर्वाधिक धोका असू शकतो. कोणतेही लक्षणे आढळली तर त्यांवर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळीच उपचार सुरु करा.