ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाविकास आघाडीचे नेते वावड्या उठवताय- चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर वृत्तसंस्था 

आज शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. त्यानंतर भाजपची नागपुरात पत्रकार परिषद पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी भूमिका मांडली. बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुकदेखील केलं.

“महायुतीचे आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. कालपासून विरोधी पक्षाचे लोकं हे शिंदे यांच्याबद्दल ते नाराज आहेत, अशा पद्धतीच्या वावड्या उठवत होते. एकनाथ शिंदे सारख्या कर्तबागर व्यक्तीबद्दल त्यांच्या व्यक्तीमत्त्वावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले. पण शिंदे यांनी महायुतीचे नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे या महाराष्ट्रातील जनतेला आणि राज्यातील सर्व जनतेला त्यांनी प्रेसच्या माध्यमातून आपली भूमिका व्यक्त केली”.

“मोदी आणि शाह आणि केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील, त्याला पूर्ण समर्थन राहील असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुती म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफा सुरू होत्या त्या वाफाच राहिल्या. शिंदे यांनी राज्याच्या विकासासाठी त्यांनी काम केलं आहे. आम्ही आधीपासून त्यांचं काम पाहत आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी चांगलं काम केलं”, असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलं.

“या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी शिंदेंनी काम केलं. शिंदे सारखा कणखर मुख्यमंत्री मिळाला. त्यांच्या कामातून त्यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सामाजिक न्याय, सामाजिक समता, आदिवासींचे काम त्यांनी केलं. एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा चेहरा म्हणून या तिघांनी मिळून विकास कामे केले”.  “मोदींच्या नेतृत्वातील विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी शिंदे यांची भूमिका महत्त्वाची आहे. शिंदे, फडणवीस आणि अजितदादांनी जो अभूतपूर्व विजय मिळवला. महायुतीला मोठा मॅनडेट मिळाला आहे. आमच्या नेतृत्वाने हा मॅनडेट मिळाला आहे. मोदींच्या नेतृत्वात हा कौल मिळाला. महायुती भक्कम करण्याचा प्रयत्न केला. शिंदे साहेब रडणारे नाही. लढणारे आहे. ते उद्धव ठाकरेंच्या सरकारला लाथ मारून बाहेर पडले तेव्हा रडून पडले नाही. ते लढून बाहेर पडले. लढवय्या राजकारणी म्हणून त्यांनी काम केलं”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

“महायुती आज अभेद्य झाली आहे. मजबूत आहे. महाविकास आघाडीचे नेते वावड्या उठवत आहे. आज एकनाथ शिंदे यांनी आज त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. मला शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. फडणवीस यांनी पक्षाने जे आदेश दिले ते पाळले. महायुती म्हणून शिंदे यांनी जी भूमिका घेतली पाहिजे ती घेतली. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो”, अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!