अक्कलकोट, वृत्तसंस्था
चपळगाव येथील श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव तथा प्राचार्य स्व.पी. वाय. पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त ग्रामीण विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चपळगाव येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन भाजपाचे जेष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन संस्था संचालक डॉ.श्री. काशिनाथ उटगे, जेष्ठ नेते अंबणप्पा भंगे, के.बी.पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी सिद्धेश्वर कल्याणशेट्टी यांनी मनोगतात सांगितले. स्व.पी वाय.पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात नवीन मापदंड निर्माण केले.चपळगाव प्रशाला आजही शिक्षण क्षेत्रात आदर्शवत आहे याचे कारण पाटील यांनी येथे गुणवत्तापूर्ण आणि संस्कारक्षम शिक्षणरुपी वटवृक्ष उभारले. यानंतर प्रतिवर्षाप्रमाणे पी. वाय. पाटील फाउंडेशन, नंदादीप हॉस्पिटल, सांगली आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, चपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात टीमकडून १२५ रुग्णांची नेत्र चिकित्सा करण्यात आली. १२५ पैकी ३५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निदान करण्यात आले.
यावेळी जयंतीदिनाचे औचित्य साधून इयत्ता १० वी १९९४-९५ बॅचचे माजी विद्यार्थी व उद्योगपती गुरुनाथ दोड्डाळे यांनी प्रशालेस डायस भेट दिले. त्यानिमित्ताने दोड्डाळे यांचा सिद्धेश्वर कल्याणशेट्टी आणि संचालक डॉ.काशिनाथ उटगे यांच्या हस्ते सन्मान करून आभारपत्र देण्यात आले. या शाळेने व गुरुजनांनी मला घडवले म्हणून मी आज उद्योजक बनलो. या शाळेचे ऋण व्यक्त करणे माझे कर्तव्य आहे, असे दोड्डाळे यांनी आपले मत व्यक्त केले.
याप्रसंगी कार्याध्यक्ष पंडित पाटील, जेष्ठ संचालक मल्लिकार्जुन पाटील, मनोज इंगुले, परममंगल उद्योग समूहाचे ओंकार पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य मठदेवरू, नंदकुमार पाटील, दिपक पाटील, महादेव वाले, दयानंद फताटे, राजकुमार भंगे, प्राचार्य माने, पर्यवेक्षक बानेगाव, नीलकंठ पाटील, रियाज पटेल आदिंसह पंचक्रोशीतील नागरिक, शिक्षकेत्तर कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.