ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चेन्नई सुरत ग्रीनफिल्डच्या नुकसान भरपाईचा विषय सभागृहात ; नाशिकचे आमदार दिलीप बनकरांनी उठविला आवाज

अक्कलकोट : चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड महामार्गातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला कमी मिळणार असल्याने शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी विधानसभेत आवाज उठविला असून त्यांनी समृद्धीच्या धर्तीवर शेतकऱ्यांना पाचपट मोबदला मिळावा, अशी आग्रही मागणी केली आहे. सध्या अधिवेशन सुरू आहे. नाशिक, नगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये सध्या अत्यल्प मोबदल्यावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. हा प्रश्न विधानसभेत कोण उठविणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर नाशिकचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बनकर यांनी प्रश्न लावून धरून शेतकऱ्यांविषयी सहवेदना दाखविली आहे.

समृद्धी महामार्गाला ज्या पद्धतीने राज्य सरकारने भरघोस नुकसान भरपाई दिली आहे त्याच धर्तीवर राज्य सरकारने चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड बाबतीतही धोरण ठेवावे. दुटप्पी धोरण सोडावे. शेतकऱ्यांसाठी सध्या जे दर ठरविले आहेत ते खूपच अन्यायकारक आहेत. त्यात तातडीने बदल करावा. हा विषय पाच जिल्ह्यांमध्ये प्रभावीत झाला असून राज्य सरकारने यात त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यांमध्ये या प्रश्नावरून शेतकरी आणि प्रशासनामध्ये संघर्ष चिघळला आहे. असे असताना अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते. परंतु दोन आठवड्यापूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी संघर्ष समितीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यासोबत दोनच दिवसांमध्ये आपण निर्णय घेऊ, असेही सांगितले होते.  मात्र आज दहा ते अकरा दिवस उलटले तरीही याबाबत ना बैठक ना चर्चा झाल्याने शेतकऱ्यातून संतापाची लाट उसळली आहे.

शेतकऱ्यांच्या मनामध्ये खंत

सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी हे सभागृहात असताना याबाबत कोणीही आवाज उठवला नाही. याउलट नाशिकच्या आमदारांनी याविषयी आवाज उठवून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले, ही बाब शेतकऱ्यांना खंत वाटणारी आहे. काही झाले तरी आम्ही जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाणार नाही. तोपर्यंत मागे हटणार नाही – बाळासाहेब मोरे,अध्यक्ष शेतकरी संघर्ष समिती

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!