अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायराज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे गावास भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. मुख्यमंत्री समृद्ध गाव योजनेअंतर्गत तालुक्यातील पाच गावे लक्षित असल्याने या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी जंगम यांनी स्वच्छता, घरकुल योजना, आयुष्यमान भारत योजना, महिलांची आरोग्य तपासणी, अॅनेमियाचे उच्चाटन, महिलांच्या सभा तसेच बचतगटांमार्फत स्वयंरोजगार यांसारख्या सर्व उपक्रमांचा एकत्रित कॅम्प आयोजित करण्याचे आवाहन केले. यामुळे गावकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व योजनांचा लाभ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दहिटणे येथील वनराई बंधाऱ्याची पाहणी करून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासोबतच पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने वनराई बंधारे उपयुक्त ठरतात, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना त्यांनी थकीत कर वसुली डिसेंबर अखेर भरल्यास ५० टक्के सूट मिळणार असल्याची माहिती दिली. तसेच आयुष्यमान भारत कार्ड काढून योजनेचा लाभ घ्यावा, त्यातून प्रशस्त वैद्यकीय मदत मिळते, असे आवाहन केले. जिल्हा परिषद सेस फंडातून सोलर सिस्टीम बसविण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
याशिवाय जिल्हा परिषद शाळेसाठी सात सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर करण्यात येणार असून, त्याबाबतचे आदेश दोन दिवसांत काढले जातील, अशी ग्वाही देण्यात आली. जनसुविधा योजनेचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत, असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
या दौऱ्यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवितके, उप अभियंता उषा बिडला, सहाय्यक गटविकास अधिकारी अमोल मुंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, वैद्यकीय अधिकारी शिवलीला माळी, उप अभियंता व्ही. डी. राठोड, सरपंच नितीन मोरे, उपसरपंच शरणू कोलशेट्टी, विस्तार अधिकारी यू. एम. पठाण, ग्रामपंचायत सदस्य विकी बाबा चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी अभिमन्यु ताड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.