मुंबई : वृत्तसंस्था
देशभर अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशातील सर्वच नेत्यांसह दिग्गज मान्यवरांची हजेरी लागणार आहे मात्र आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अयोध्येला जाणार नसल्याची माहिती खात्रीलायक समोर आली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील एकही मंत्री उपस्थित असणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सूचक ट्विट करत माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह फडणवीस आणि पवार या सोहळ्याला जाणार नाहीत. याउलट मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला घेऊन अयोध्या दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री लवकरच या दौऱ्याची माहिती जाहीर करतील.
एकनाथ शिंदेंचे ट्विट काय?
जय श्री राम…
अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीजी यांनी साकार केलं आहे. मोदीजींचे शतशः आभार…
अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.