मुंबई, दि. ३१ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे डिजीसीएच्या निकषानुसार काम लवकरात लवकर पूर्ण करून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची ७४ वी बैठक वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.
बैठकीत राज्यातील विविध विमानतळाच्या विकासकामांचा तसेच तेथील सेवा-सुविधांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव बलदेव सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानचालन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुटीया, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी संजय कांगणे, कंपनी सचिव प्रणिता भिसे उपस्थित होते. याशिवाय नागपूर येथून विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार, नागपूर महापालिका आयुक्त बी. राधाकृष्ण, नागपूरचे जिल्हाधिकारी तथा विमानतळ विकास कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक रवींद्र ठाकरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय आणि रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. विमानतळावरील धावपट्टीच्या कामाबाबत डिजीसीएने अहवाल दिला आहे. त्या निकषानुसार वेळेत धावपट्टीचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. निश्चित अशा कालमर्यादेत काम पूर्ण व्हावे यासाठी विमानतळ विकास कंपनी, एमआयडीसी यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
बैठकीत विमानतळ विकास कंपनीच्या गतवर्षभरातील वाटचालीचा आढावा घेण्यात आला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कपूर यांनी राज्यातील विविध विमानतळांच्या कामांविषयी सविस्तर अहवाल सादर केला. शिर्डी विमानतळावरून कार्गो सुविधा सुरु केल्याने चांगला महसूल मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या सुविधेमुळे परिसरातील गुलाब, भाजीपाला, द्राक्ष, पेरू उत्पादक शेतकऱ्यांचा माल देशभरात पाठविता येऊ लागला आहे. लवकरच येथे नाईट लॅण्डिंग सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.