ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“माझे रोप माझी जबाबदारी” अभियानास सोलापूरकर नागरिकांचा प्रतिसाद; विविध संस्थांनी वनविभागाकडे केली 28 हजार रोपांची मागणी

सोलापूर, दि. 9: वन आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आयोजित “माझे रोप माझी जबाबदारी” अभियानास जिल्ह्यातील विविध तालुक्यातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यातील सुमारे वन विभाग 177 आणि सामाजिक वनीकरण विभागाकडे 10 संस्थांनी आणि 130 वैयक्तिक नागरिकांनी 28 हजार रोपांची मागणी नोंदवली आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी आज दिली.

जिल्ह्यातील वनाखालील क्षेत्र वाढावे, लोकांनी झाडे लावण्यासाठी सहभाग द्यावा यासाठी वन विभागाने माझे रोप माझी जबाबदारी अभियान सुरू केले आहे. पाच जूनपासून हे अभियान सुरू आहे. शंभरहून अधिक रोपांची मागणी करणाऱ्या संस्था, संघटनांना त्यांच्यापर्यंत रोपे पोहोचवण्याची तयारी वन विभागाने केली आहे. यासाठी वन विभागाकडे 188 संस्थांनी 28 हजार रोपांची मागणी केली आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले. या अभियानात देशी आणि स्थानिक प्रजातींची रोपे लावण्यावर भर दिला जाणार आहे.

★ सवलतीच्या दरात रोपे

राज्यात 15 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान वन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या कालावधीत वन विभागातर्फे सवलतीच्या दरात रोपे पुरवण्यात येणार आहेत. सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना अल्पदरात रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी वन महोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दरात रोपे मिळणार आहेत. 15 जूननंतर सर्वसाधारण कालावधीत नऊ महिन्यांचे रोप (लहान पिशवीतील रोप) 21 रुपयांना तर 18 महिन्याचे रोप (मोठ्या पिशवीतील रोप) 73 रुपयांना देण्यात येते. परंतु वनमहोत्सवाच्या काळात नऊ महिन्यांचे रोप 10 रुपयांना तर 18 महिन्यांचे रोप 40 रुपयांना उपलब्ध असेल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

★ सहभागाचे आवाहन

ज्या शासकीय यंत्रणांना वृक्ष लागवड करावयाची आहे अशा यंत्रणांना रोपनिर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्यास त्यांना रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येईल. यासाठी त्यांनी लागणाऱ्या रोपांची आगाऊ मागणी, नजिकचे उपवनसंरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडे पत्राद्वारे करावी. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, निसर्गप्रेमी यांनी घेऊन वनेतर क्षेत्रावर हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी श्रीमती संध्याराणी बंडगर (9922937981), संजय भोईटे (9421584619) [email protected] यांच्याशी संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!