ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तिरंगा संविधान रॅलीत कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट !

मुंबई : वृत्तसंस्था

छत्रपती संभाजीनगर ते मुंबईपर्यंत सोमवारी तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली. रामगिरी महाराज यांनी मोहंमद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करूनही काहीही कायदेशीर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आवाहनानुसार ही तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली होती. मात्र पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही रॅल माघारी फिरली. नाशिकसह मालेगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार भागातील तब्बल ५०० हून अधिक वाहने या रॅलीत सहभागी झाली होती. छत्रपती संभाजीनगरात रॅली निघत असताना सुमारे ६०० वाहनांची नोंद होती.

एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची घटना काल रात्री ठाणे शहरातील आनंद नगर जकात ब्लॉकजवळ घडली. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली माघारी फिरत असताना हा प्रकार घडला. कार्यकर्त्यांनी केलेल्या झटापटीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवले. रामगिरी महाराजांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि नितीश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शेकडो लोकांसह छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी तिरंगा संविधान रॅली काढली. काल रात्री ही तिरंगा रॅली ठाण्यात पोहोचल्यानंतर भिवंडी, मुंब्रा या मुस्लिमबहुल भागातील कार्यकर्तेही रॅलीत सहभागी झाले. मात्र प्रशासनाने या कार्यकर्त्यांना आणि रॅलीला मुंबईत प्रवेश करण्याची परवानगी दिली नाही.

त्यानंतर इम्तियाज जलील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आम्ही आमचे म्हणणे सरकारपर्यंत पोहोचवले आहे. आता कारवाई झाली नाही तर जेलभरो आंदोलन करू, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. यानंतर लोकांनाही माघारी फिरण्याची विनंती केली. रॅली परतत असताना गर्दी खूप होती. ठाण्यातील आनंद नगर जकात नाक्यावर कोणत्यातरी मुद्द्यावरून जमावातील लोकांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर जमावातील काही लोकांनी पोलिसांना धक्काबुक्की करण्यात सुरवात केली. त्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला आणि लोकांना पळवून लावत जमावाला पांगवले. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!