मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यातील जनतेला सरकारी योजना मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर आता अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’ची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज दि. ०६ जानेवारी सकाळीच पाहणी करण्यात आली. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याची पाहणी करत कोणतेही काम अपूर्ण राहिले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.
यावेळी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ”निवडणुका डोळ्यासमोर आम्ही कोणतेही काम करत नाही. याआधी देखील बरेच प्रकल्प पूर्ण केले, तेव्हा कोणत्या निवडणुका होत्या का? जे अडीच वर्ष काम बंद करून घरात बसले होते, त्यांनी केलेली घाण साफ करण्याचे काम आमचे सरकार करत आहे”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. तसेच या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पाचे भूमिपूजन हे पंतप्रधानांच्याच हस्ते झाले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यामुळे आता पुन्हा मोदींच्याच हस्ते याचे उद्घाटन होणार असल्याने याचा आम्हाला आनंद आह असेही शिंदे म्हणाले.