मुंबई : वृत्तसंस्था
विशेष मुलांना विशेष काळजीची गरज असते. अशा मुलांसाठी सुरू झालेल्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार असून, मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक केंद्र सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे येथे देखील एक केंद्र सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘संपूर्ण स्वच्छता मोहिमे’ ला लोकचळवळीचे स्वरूप आले असून, लवकरच स्वच्छतेचा हा मुंबई पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये टप्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि प्रदूषण मुक्त करण्यात येत आहे. स्वच्छता हा विषय नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असल्याने स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे, त्यामुळे जगात सर्वांना अपेक्षित अशी स्वच्छ आणि सुंदर मुंबई करण्यावर भर दिला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. बस थांबे स्वच्छ ठेवावेत, दुभाजकांमधील झाडे व्यवस्थित लावावीत, रस्ते एक दिवसाआड धुतले जावेत, धूळ उडू नये, यासाठी बांधकाम सुरू असलेल्या इमारती झाकल्या जाव्यात, अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या. या मोहिमेत अधिकाऱ्यांबरोबरच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असून, ते या मोहिमेचे खरे हिरो आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यांच्या इतर अडचणीदेखील दूर करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.