नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील उत्तराखंडमधील चमोलीच्या थराली येथे मध्यरात्री ढगफुटीची घटना घडली आहे. येथे मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाले असून यात 2 जण बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
याप्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ते सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. तसेच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाला तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘एक्स’वर पोस्ट करत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, “चमोली जिल्ह्यातील थरली भागात रात्री ढगफुटी झाल्याची दुःखद बातमी मिळाली. जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ, पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. मी या संदर्भात स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे आणि परिस्थितीवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करतो.”
चामोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री थरली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, थराली पोलिसांनी रात्रीच तत्परता दाखवत स्थानिक लोकांना सतर्क केले आणि त्यांना त्यांच्या घरातून सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आहे. दरम्यान, चमोली जिल्ह्यातील थराली येथे ढगफुटी झाल्याने घरे, बाजार आणि एसडीएम निवासस्थानाचे नुकसान झाले आहे. एसडीएम निवासस्थान देखील चार फूट ढिगाऱ्याने भरले आहे. यात दोन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.