मुंबई वृत्तसंस्था
आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज (7 डिसेंबर) शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी राजूर येथे जाऊन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं अंतिम दर्शन घेतलं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय म्हणजे लोकशाहीचा अपमान असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. “जनतेनं त्यांना निवडून दिलं, तेच आता शपथ घ्यायला नकार देत असतील तर हा जनतेचा अपमान आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केलीय.
मधुकर पिचड यांचं काल निधन झालं. त्यांचं पार्थिव हे त्यांच्या मूळगावी राजूर येथे निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी राजूर येथे येवून मधुकर पिचड यांचं अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्रातील राजकारणात आदिवासी दलित वंचितांचे नेते म्हणून मधुकर पिचड यांच्याकडे पाहिलं जायचं. आदिवासी समाजात शिक्षणाचा प्रसार तसंच आदिवासी वनजमिनीच्या विषयात त्यांचा रस होता. निळवंडे धरणाचं काम पूर्ण करण्यात पिचड यांचा मोठा वाटा राहिला असून धरणाला राघूजी भांगरे नाव देण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. महायुती सरकारनं निर्णय घेवून धरणाला राघूजी भांगरे नाव दिलं, त्यानंतर मधुकर पिचड यांनी आनंद व्यक्त केला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.