सातारा, लोकशाही न्युज नेटवर्क
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात ही घटना घडल्याचे समोर आले. मुख्यमंत्री साताऱ्यातील त्यांच्या दरे या मूळ गावातून हेलिकॉप्टरने पुण्याला जात होते. यावेळी खराब हवामानामुळे इर्मजन्सी लॅंडिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री वाहनातून पुण्याकडे रवाना झाले. पण सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, हे चांगले झाले. मुख्यमंत्र्यांसोबत स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मंगेश चिवटे, विशेष कार्यकारी अधिकारी कवळे हे हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळगावी दरे येथे आले होते. येथून ते शुक्रवारी दुपारी हेलिकॉप्टरमधून मुंबईला जाणार होते. ठरल्यानुसार हेलिकॉप्टरने इथून टेक ऑफ केले. मात्र थोड्याच वेळात हवामान बदलले आणि ढग दाटून येत पावसाला सुरूवात झाली. या परिस्थितीत संभाव्य धोका ओळखून पायलटने हेलिकॉप्टर पुन्हा लँड करण्याचा निर्णय घेतला. टेक ऑफच्या अवघ्या पाच मिनिटात हेलिकॉप्टर पुन्हा लँड करण्यात आले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंग करण्यामागचा थरार सांगितला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या गावातून हेलिकॉप्टरने पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मंगेश चिवटे आणि विशेष कार्य अधिकारी कवळे हे देखील हेलिकॉप्टरमध्ये होते. यावेळी पुण्याच्या दिशेला जात असताना अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले अन् मुसळधार पाऊस सुरु झाला. यामुळे हेलिकॉप्टर हवेत भरकटायला लागलं.
कोयना बॅकवॉटरच्या अगदी पंधरा फूटांवर हेलिकॉप्टर खाली आले होते. आजूबाजूच्या कोणत्याही एका शेतामध्ये हेलिकॉप्टर लँड करावे का? याबाबत पायलट आमच्याजवळ विचारणा करत होते. पण त्या सोयीची कोणतीही जमीन आजूबाजूला नसल्याने आमचे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा माघारी दरे या गावाच्या दिशेने निघाले. जेथून आम्ही टेकऑफ घेतला होता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड झाले आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले, असं मंगेश चिवटे यांनी सांगितलं