नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक ठिकाणी सध्या थंडीचा जोर वाढू लागला आहे त्यामुळे डोंगराळ भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत असून मराठवाड्यासह विदर्भात गारठा वाढला आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात वाढ होईल आणि थंडीचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे येत्या ४८ तासांत जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय काही भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, चंदीगड आणि बिहारमध्ये अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा येथील तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. आजच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले, तर अंदमान आणि निकोबार गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख आणि हिमाचल प्रदेशात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तामिळनाडू सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात देखील पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके म्हणजे १४ डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान ८ ते १० डिग्री सेल्सिअसच्या दरम्यानचे असू शकते.