सोलापूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विधानसभा निवडणूक 2024 कायदा व संस्था आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपयुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्या सह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, पोलीस विभागाने लोकसभा निवडणूकी प्रमाणे विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ही जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अत्यंत चोखपणे राहील यासाठी आवश्यक उपायोजना कराव्यात. लोकसभा निवडणूक कालावधीत जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी कॅश किंवा दारू जप्त करण्यात आली होती अशा ठिकाणी पोलीस विभागाने सुरक्षा अधिक चोख ठेवावी. तसेच वलनेरब्ल व क्रिटिकल मतदान केंद्रावर योग्य सुरक्षा पुरवण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या समवेत पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, असेही त्यांनी सुचित केले.
यावेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने पोलीस प्रशासनाने नियोजन केलेले असून सर्व क्रिटिकल मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामीण पोलीस दल तयार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी दिली.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच वलनरेबल व क्रिटिकल मतदान केंद्राच्या अनुषंगाने सर्व पोलीस अधिकारी सेक्टर ऑफिसर यांचे प्रशिक्षण दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी ठेवण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या अनुषंगाने सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली.