---Advertisement---

मोहोळ तालुक्यात मतदान यंत्रावरून संभ्रम; आयोगाचे स्पष्टीकरण

By team
On: February 9, 2026 10:06 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्रे वेळेत सुरक्षा कक्षात जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच मोहोळ येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मतदान यंत्रांचा प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापर झालेला नाही. ही यंत्रे राखीव स्वरूपातील होती. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार किंवा अनियमितता आढळून आलेली नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, ही मतदान यंत्रे वेळेत सुरक्षा कक्षात जमा न केल्याबाबत गंभीर दखल घेतली जात असून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे.

मोहोळ तालुक्यातील २२० मतदान केंद्रांवर दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानानंतर काही राखीव मतदान यंत्रे तात्काळ सुरक्षा कक्षात जमा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. कुरूल (५५) गटातील काही मतदान केंद्रांसाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडील ०२ कंट्रोल युनिट व ०२ बॅलेट युनिट यासंदर्भात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, ही मतदान यंत्रे एका वाहनातून खासगी ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिक व राजकीय प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. घटनेची माहिती मिळताच निवडणूक प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सर्व उपस्थितांच्या साक्षीने पंचनामा करण्यात आला. ही मतदान यंत्रे राखीव स्वरूपातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ती शासनाच्या सुरक्षा कक्षात सीलबंद करण्यात आली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!