ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे; अक्कलकोट भाजपावर जनतेचा पूर्ण विश्वास !

नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांची प्रतिक्रिया

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वातावरणावर भाजपकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत,काँग्रेसचे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. दबाव टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट केले. काँग्रेसने वेगवेगळ्या प्रभागांतील उमेदवारांनी माघार घेतल्याचा दोष भाजपावर दिल्यानंतर कल्याणशेट्टी प्रथमच माध्यमांसमोर आले आणि संपूर्ण परिस्थितीवर त्यांनी भूमिका मांडली.

कल्याणशेट्टी म्हणाले की, मागील आठ– दहा वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोटमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. शहर आणि तालुक्याचा झालेला कायापालट जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या उन्नतीसाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. त्यामुळे जनतेची मानसिकता नैसर्गिकरित्या भाजपच्या बाजूने तयार झाली आहे,असे ते म्हणाले. विरोधकांना पराभव जवळ येत असल्याचे दिसत असल्यामुळेच बिनबुडाचे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेसच्या उमेदवारांच्या कमतरतेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की,काँग्रेस खरोखरच सक्षम असती तर शहरात उमेदवारांची टंचाई भासली नसती. आज उमेदवार मिळत नाहीत, आणि याचे खापर भाजपावर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आधी स्वतःच्या संघटनेतील कमकुवतपणावर चिंतन करावे,असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला दिला. अक्कलकोटमधील सुज्ञ मतदार प्रत्येक पक्षाची कामगिरी ओळखतो व त्यानुसार निर्णय घेतो, असेही ते म्हणाले.

शेवटी, शहरातील मतदारांना विकासच हवा असून बाकीच्या गोष्टीत त्यांना रस नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.आम्ही लोकांसमोर विकासाचे स्पष्ट मॉडेल ठेवले आहे. त्यामुळे जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळातही अक्कलकोटचा चौफेर विकास करू,असा विश्वास व्यक्त करत त्यांनी निवडणुकीत भाजपाचाच विजय
निश्चित असल्याचा दावा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!