लातूर : वृत्तसंस्था
जनतेच्या अडचणी न सोडवता त्या तशाच लटकवून ठेवण्यात काँग्रेस पक्षाला जास्त आनंद मिळतो, महाराष्ट्राचा पाणीप्रश्न रेंगाळत ठेवला. काँग्रेस आणि समस्या हे जुळे भाऊ आहेत. भाजपने हर घर जल योजनेतून घरोघरी नळाद्वारे शुद्ध पाणी दिले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नागरिकांची संपत्ती जमा करून ती त्यांच्या मतदारांना वाटणार असल्याचे दिसते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगचा अधिक प्रभाव आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लातूर येथील जाहीर सभेतून केली.
येथील सारोळा रस्त्यावर मंगळवारी दुपारी अडीच वाजता लातूर लोकसभेतील उमेदवाराच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आदी उपस्थित होते.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, ‘इंडिया’ आघाडी पंतप्रधानपदाला एक-एक वर्ष वाटून घेणार आहे. पदाला वाटून घेणारे विकाऊ लोक देश विकासासाठी काय काम करणार, देशाला लुटण्याची त्यांची योजना आहे, हे विरोधकांचे स्वप्न तुम्ही पूर्ण होऊ देणार का, असे म्हणून नरेंद्र मोदींनी अशा कठीण परिस्थितीत विरोधकांच्या हाती सत्ता देऊन देशाला अस्थिरतेच्या खाईत ढकलणार का, असा सवाल उपस्थितांना विचारत ते म्हणाले, विरोधी इंडिया आघाडी देशाला लुटण्याचा प्लॅन तयार करीत आहे. ते तुमच्या संपत्तीचा अध्यपिक्षा जास्त हिस्सा सरकारला जमा करण्यास सांगणार आहेत. ती संपत्ती त्यांच्या मतपेटीत वाटण्याचा त्यांचा विचार आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगचा अधिक प्रभाव आहे. यामुळे अशा व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांना तुम्ही मते देणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित करून काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली. काँग्रेस पक्षाने देशाला गरिबीशिवाय काहीच दिले नाही. ते अत्यावश्यक गरज असलेले शौचालयही देऊ शकले नाहीत, काँग्रेस आणि समस्या हे जुळे भाऊ आहेत. काँग्रेसने कोणतीही अडचण सोडवली नाही. ती तशीच ठेवून नागरिकांना समस्यांच्या खाईत ढकलण्याचे काम केले. मराठवाडा वॉटरग्रीडची योजना महाराष्ट्रातील महायुती सरकारने मंजूर केली होती. ती महाविकास आघाडीच्या सरकारने बंद केली. यामुळे मराठवाड्यात पाणीप्रश्न भेडसावत आहे. मराठवाडा वॉटरग्रीड योजना महायुती सरकार पूर्ण करून या भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा संपवणार आहे, असे ते म्हणाले