मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात आगामी काळात होवू घातलेल्या स्थानिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून आता आघाडी, युती करताना काँग्रेसचे मोठे नुकसान होत असून पक्ष कमजोर होत असल्याबाबतच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढविताना संपूर्ण राज्यात सरसकट आघाडी होणार नाही. स्वबळावर किंवा आघाडी करून निवडणुका लढवायच्या याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या-त्या स्थानिक पातळीवरच देण्यात आले आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टपणे सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर हर्षवर्धन सपकाळ यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, कॉंगेस पक्षातील काही उणीवा, त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. तालुका पातळीपासूनच संघटना मजबूत करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पुण्यातील गटबाजी आता राहिलेली नाही. सर्व एका दिलाने कामाला लागले आहेत. प्रदेश कार्यकारिणीतही समावेशकता आणण्यात आली आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुका लढताना काही तडजोडीत उणिवा राहिल्या. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तिकीट वाटप सुरळीत होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय निरीक्षक नियुक्त केले आहेत. हे निरीक्षक, जिल्हाध्यक्ष स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन निवडणुकांबाबतचा योग्य तो निर्णय घेणार आहेत, असे सपकाळ यांनी सांगितले.तोडा-फोडा-झोडा आणि राज्य करा, या रणनीतीचा वापर भाजपकडून केला जात आहे.
जातीय तेढ निर्माण करून पोळी भाजून घेण्याचे कामही भाजप कडून सुरू आहे. आरक्षणाच्या गोंधळामुळे मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडणे होऊ लागली आहेत, असेही सपकाळ यांनी ठामपणे मांडले. जातीनिहाय जनगणना करून त्यानुसार आरक्षण दिल्यास आरक्षणाचा प्रश्न सुटेल, अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मतचोरी, मतदार याद्यांमधील घोळ, शेतकरी वर्गाचे प्रश्न, वाढती बेरोजगारी यांसह अन्य प्रश्नांसाठी पदयात्रा, मोर्चे, आंदोलन यालाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.