सोलापूर : सोलापूरमध्ये कॉंग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले व माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसला खिंडार पडले आहे.
पक्षातील अंतर्गत गटबाजी व कमी झालेल्या मान- सन्मानाला वैतागून माजी महापौर नलिनी चंदेले व माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षीय राजकारणात फारसे सक्रीय नसल्याचे बोलले जात आहे. यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. दुसरीकडे, प्रदेशची जबाबदार असल्याने आमदार प्रणिती शिंदे यांना शहराकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे पक्ष संघटन विस्कटल्याचे या पक्षांतरानंतर स्पष्ट झाल्याची चर्चा आहे.
2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केलेले महेश कोठे यांनी महापालिकेत शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर आणून ठेवले. मात्र आता महेश कोठे यांनीच राष्ट्रवादीची वाट धरल्याने त्यांच्या कुटुंबातील नगरसेवकांसह त्यांचे नगरसेवकही पक्षांतर करतील,अशी चर्चा आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी भाजप विरोधात एकत्रित लढणार नाही, असाही तर्क काढला जात आहे.