नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी त्यांनी बहीण प्रियंका गांधी यांच्यासोबत रोड शो केला. यावेळी राहुल यांनी परिसरातील जनतेला सांगितले की, तुमचा खासदार होणे ही भाग्याची गोष्ट आहे. इंडियाचा भाग असलेल्या सीपीआयच्या ॲनी राजा वायनाडमधून राहुल यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. ॲनी राजा यांनीही बुधवारी रोड शो करून उमेदवारी दाखल केली. त्याचवेळी भाजपने राहुल यांच्याविरोधात के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवले आहे.
यासोबतच पक्षाचे ‘पाच न्याय, पंचवीस गॅरंटी’ देशातील जनतेपर्यंत नेण्यासाठी काँग्रेसने ‘घर घर गॅरंटी’ अभियान सुरू केले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्याची सुरुवात ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून केली. किमान 8 कोटी घरांमध्ये गॅरंटी कार्ड पोहोचवण्याची पक्षाची योजना आहे. राहुल वायनाडच्या लोकांना म्हणाले – तुमचा खासदार होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी तुम्हाला मतदार म्हणून वागवत नाही. माझी धाकटी बहीण प्रियांकाशी जसा वागतो तसाच मी तुमच्याशी वागतो. वायनाडमध्ये माझ्या घरी बहिणी, आई, वडील आणि भाऊ आहेत आणि त्यासाठी मी मनापासून आभार मानतो.
‘घर-घर गॅरंटी अभियान’ सुरू करण्याच्या घोषणेवर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, आमच्या घर-घर गॅरंटी अभियानाची सुरुवात येथून होत आहे. आम्ही 8 कोटी कुटुंबांना गॅरंटी कार्ड देऊ. काँग्रेस अध्यक्ष आणि राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जाहीर केलेली आमची 5 न्याय 25 गॅरंटी कार्डे आजपासून वितरित केली जाणार आहेत.