ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काँग्रेस–रासप युतीची घोषणा; ‘लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र लढणार’

मुंबई वृत्तसंस्था : महायुतीतील पक्षांनी आगामी निवडणुका एकत्र लढण्याची तयारी दर्शवली असताना, विरोधी राजकारणातही मोठी हालचाल सुरू झाली आहे. काँग्रेसने राष्ट्रीय समाज पक्षासोबत (रासप) आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी युती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या युतीची अधिकृत घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

युतीची घोषणा करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणाचा व्यापक विचार करता आम्ही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप लोकशाही संपवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विचारधारेतून हुकुमशाहीविरोधात एकत्र लढणे गरजेचे आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आम्ही एकत्र लढणार आहोत.” नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्येही रासपने काँग्रेसला सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, युतीबाबत भूमिका स्पष्ट करताना रासपचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले, “देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेससोबत राहणे आवश्यक आहे. मला काँग्रेसने बोलावले नाही, तर देशहितासाठी मी स्वतःहून हा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्व लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे.”

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस–रासप युतीची ही घोषणा राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणारी ठरणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही आघाडी किती प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!